Saturday, March 28, 2020

आले देवाजीच्या मना... (By chance, luck or anything else?)

“आले देवाजीच्या मना...”
(By chance, luck or anything else?)

(ललित लेख २७; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




२०१३ मध्ये मी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असतानाचा योगायोग!

“अहो, तुम्ही दोघे माझ्या आजी-आजोबांसारखे आहात म्हणून सांगतोय... अजून दोन दिवस थांबा... न्यूमोनियाच्या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होईल...”

“न्हाई आता डाक्टर सायेब... शेतीची कामं हाईती... जित्राबं हायंत...  लई कामं खोळांबल्यात... सुट्टी द्या आमास्नी...”

“सगळं समजावून झालंय आजी; तरीही जायचंच असेल तर तुमच्या जबाबदारीवर सही करून जा...”

“व्हय... नशीब आमचं... इट्टलाला काळजी...
.
.
.
.
.
संध्याकाळी एस. टी.च्या अपघाताची बातमी पोलिसांनी कळवली. त्यातील रुग्ण जेव्हा तपासणीसाठी माझ्याकडे आणले तेव्हा पाहतो तर काय, ‘ते’च आजी-आजोबा साक्षात स्ट्रेचरवर..!

“... लेकरा, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं...” आजी ‘कण्हत’ म्हणाल्या...

“तसं काही नसतं आजी...” कुठल्यातरी ‘गूढ शक्तींबद्दलच्या’ विचारांत असताना मी म्हटलं...

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


Saturday, March 21, 2020

भिकारी आणि याचक (A beggar and a demandant!)

“भिकारी आणि याचक!”
(ललित लेख २६; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story



‘हेक्टिक ड्यूटी’ संपवल्यावर मन प्रसन्न व्हावं म्हणून औरंगाबादेतल्या वरदगणेश मंदिरात जाऊन बसलो होतो..!

दर्शनरांगेतील एकीने माझे लक्ष वेधले... कळकट-मळकट साडीत, सोबत एक फाटकी बॅग घेऊन उभी असलेली साठीतली एक महिला... भिकारीणच ती!

जवळच्या पुडक्यातील १०-१० च्या दोन नोटा आणि एक रुपयाचं नाणं काढून तिथल्या ‘दान’पेटीत टाकून तिने नारळही वाढवला. मग, हात जोडून मनोभावे नमस्कार करून ती पुटपुटली, “असंच ठीव रं बाबा आमास्नी समाधानी; सारकं-सारकं यीत जाईन तुझ्या देवळात; नारळ बी फोडत जाईन तुला...”

परतण्याआधी आणखीन एकदा नमस्कार करून बाहेर पडताना सोन्यात मढलेला एक ‘उच्चभ्रू’ देवासमोरच्या मूषकाच्या कानात याचना करत होता, “एवढं एक टेंडर मिळूदे देवा, तुला पाच सोन्याच्या नारळाचं तोरण बांधीन..!”



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५



Saturday, March 14, 2020

तुझ्या सुखात हसणार मी..! (Finding happiness others happiness..!)

“तुझ्या सुखात हसणार मी..!”
(कपडेवाली ‘बाई’: भाग २)
(ललित लेख २५; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




“घ्या, तुमच्या नव्या बाळासाठी कपडे घ्या. बाळाला गरम ठेवा. मावशी, ताई, अक्का... स्वस्तात घ्याऽऽऽ...”

“मावशी, थांबा... दाखवा बगू, कसली कापडं हायंती?”

“लहान बाळांचे आहेत; चांगले आहेत... घ्या...”

“किती रुपये जोडी, मावशी?”

“शंभर, ताई... दोन घ्या; १८० ला... दोन लागतीलच की...”
.
.
.
.
.
“... अवो मावशी, हे टकुचं आलं की ज्यादाचं चुकून... आमी फकस्त दोन सदरा-चड्डी जोड्याचंच पैकं दिलतं तुमाला..! घ्या ह्ये परत...”

“... चुकून नाही; मुद्दामच दिलंय मी ते... ठेवा, असूद्या... (पुटपुटत) तसंही माझ्याजवळ एखादं जास्तीचं राहूनही काही फायदा नाही म्हणा...”

“म्हंजी ओ मावशी... काय झालं..?”

“काही नाही हो... मूलबाळ नाही मला... म्हणून नवऱ्यानं सोडलं...माहेरच्यांनीही घरात घेतलं नाही...”
.
.
.
.
.
“... हे कपडे असून उपयोग काय? घालू कुणाला ती..?”


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Saturday, March 7, 2020

घामाचं मोल घामालाच..! (Sweating India: Clean India)

“घामाचं मोल घामालाच...!”
(कपडेवाली ‘बाई’: भाग १)
(ललित लेख २४; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




“घ्या, तुमच्या नव्या बाळासाठी कपडे घ्या. बाळाला गरम ठेवा. एकदम स्वस्तात घ्या... मावशी, आई, ताई, अक्का... लवकर या...”

“मावशी, थांबा जरा... दाखवा बगू, कसली कापडं हायंत?”

“लहान बाळांचे आहेत ओ; चांगले आहेत... घ्या...”

“किती रुपये जोडी, मावशी?”

“शंभर, ताई... दोन घ्या; १८० ला... दोन लागतीलच की बाळाला...”
.
.
.
.
.
“... अवो मावशी, हे टकुचं आलं की ज्यादाचं चुकून... आमी फकस्त दोन सदरा-चड्डी जोड्याचंच पैकं दिलतं तुमाला..! घ्या ह्ये परत...”

“... चुकून नाही; मुद्दामच दिलंय मी ते...  तुम्हीपण माझ्यासारखीच कष्टाची भाकर खाताय हे बघून बरं वाटलं...”

“शेवटी ‘घामालाच घामाचं मोल’ म्हणत्यात, नव्हं का..?”

शेजारीच कुणाच्यातरी एफ. एम. वर जाहिरात चालू होती, “इक कदम... स्वच्छ भारत की ओर..!”



(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९१८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.in

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...