Sunday, November 24, 2019

‘ही ‘माणुसकी’ मरायला हवी!’ (This kind of humanity should die!)

‘ही ‘माणुसकी’ मरायला हवी!’
(ललित लेख ९; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

“सोडा हो मला; नाहीतर गुन्हेगारच वाटत असलो तर, थेट गळा कापून ‘पूर्ण’ मारून तरी टाका एकदाचं...

‘जेसीबी’चं ‘रक्ताळू’ पातं पाठीत घुसून माझ्या मणक्याचा खुळखुळा करत, पोट ‘फोडत’ ज्यावेळी आरपार गेलं, त्यावेळी असह्य वेदनांची अशी काही शिसारी उठली, की बस्स..!



माझ्या आईच्या पाच पिढ्यांनी तुमच्या घराचं ‘गोकुळ’ केलं..! त्यांची जातिवंत खोंडं ताकद आणि शर्यतीसाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती...शेतीच्या कामाचाही आम्ही कंटाळा केला नाही...

बैलपोळ्याला आमचा काय थाट असायचा..! जन्मजन्मांतरीचं नातं असल्यासारखं वाटत होतं; पण तुम्ही ‘माणूस’च असल्याचं पुन्हा सिद्ध केलं..!

मी थोडा आक्रमक झालो, हे मान्य... तरीही...

तुमच्यातल्या क्रूर गोष्टींना ‘पाशवी’ संबोधून आमचा अपमान करणाऱ्या तुमच्या निष्ठूर, दुष्ट आणि विकृत ‘माणुसकी’चे काय..?”

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५  
www.dramittukarampatil.blogspot.com  
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, November 17, 2019

‘‘त्याची’ आत्महत्या: उत्तरे आणि प्रश्न’ (Suicide: More problems than solutions)

‘‘त्याची’ आत्महत्या: उत्तरे आणि प्रश्न’
(ललित लेख ८; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)




शवविच्छेदन कक्षात मी शवविच्छेदन करण्यासाठी उभा आहे! टेबलावरच्या त्या प्रेतासह खोलीत आम्ही एकूण तिघेजण आहोत.

निपचित पडलेल्या ‘त्या’चा चेहरा तसा ‘शांत’ वाटतोय..! बहुधा जाताना त्याने सुटकेचा निःश्वास सोडला असावा..!

हातात आलेला पोलिसी पंचनामा मी वाचतोय... पोलिसांनी आत्महत्येची शक्यता वर्तवलीय!

बाहेर उभारलेल्या नातेवाईकांत कुजबूज आहे... कर्ज खूप झालं होतं, मागच्याच आठवड्यात कंपनीनं नोकरीवरून काढलं... घरी आई-वडील, बायको, तीन मुलं... संसाराच्या गाड्याचं चाक खड्ड्यात रुतलं... प्रश्न पैशांचा असल्याने नातेवाईकांनी दूर सारल्यामुळे ‘त्या’चा स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकलेला ‘अभिमन्यू’ झाला!!!

‘एकटे’पणाचा ‘एकाकी’पणा झाला..! प्रश्न सुटण्याऐवजी वाढतच गेले... काळ्या ढगाला कसलीच किनार नव्हती... 

गळ्याभोवती आवळलेल्या फासात त्याने सगळ्या प्रश्नांची ‘सोपी’ ‘उत्तरे’ शोधली... घरच्यांसमोर अनंत ‘प्रश्नां’चे मोहोळ उभे करून..!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, November 10, 2019

“माणुसकीतही ‘दुटप्पीपणा’ असतो तर!” (Hypocrisy in humanity!)

“माणुसकीतही ‘दुटप्पीपणा’ असतो तर!”

(ललित लेख ७; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

किडनीच्या चौथ्या स्टेजच्या कर्करोगाचे निदान झाल्यामुळे भविष्य अंधकारमय झालेला साडेतीन वर्षांचा एक मुलगा.

डॉक्टर रुग्णाच्या वडिलांना समजावतायंत, “प्रयत्न करू; पण फार काही फायदा होईल असं वाटत नाही.”

वडील म्हणतात, “सगळे प्रयत्न करा डॉक्टर. गाडी विकली आहे, पाहिजे तर घरदार विकतो; पण बरं करा त्याला.”

रुग्णाचे वडील संध्याकाळी माझ्याबरोबर गेटपर्यंत बोलत येतात.

गेटजवळ कुत्र्याचं एक पिल्लू मागचे दोन्ही पाय लुळे झालेल्या अवस्थेत पडलंय. त्याची आई काळजीने चाटतेय त्याला!

बोलत-बोलत जास्त जवळ गेल्यामुळे ती कुत्री आमच्यावर गुरगुरते.

‘ते' “वडील” जोरदारपणे एक दगड कुत्रीच्या दिशेने भिरकावतात. ती विव्हळते!

डोळ्यांसमोर राहतं ते ‘लुळं पिल्लू’... आणि कोणत्यातरी ‘वडिलां’नी मारल्यामुळे झालेल्या असह्य वेदनांनी तळमळणारी ‘असहाय्य’ “आई”!!!



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...