Saturday, December 28, 2019

‘फाटक्या कपड्यातला ‘भिकारी’ बाप’ (The father- torn deep inside!)

‘फाटक्या कपड्यातला ‘भिकारी’ बाप’ (The father- torn deep inside!)
(ललित लेख १४; © डॉ. अमित)




“काहीतरी दे, ‘बाळा’... दोन दिवस उपाशी आहे...”

“पुढे जा ‘बाबा’,” गाडीची काच खाली करून तो बोलतो!

“एका भिकाऱ्याचं बोलणं इतकं शालीन कसं काय?!”

“ओऽऽ बाबा, थांबा... बोलायचंय तुमच्याशी.”


... ... ... ... ... ... ...


“बोला...”

“काही नाही. भिकारी असूनसुद्धा तुमची भाषा इतकी छान कशी? आहात कोण तुम्ही?”

“... (हसून)... मी संपन्न-सुसंस्कृत घरचा आणि उच्चशिक्षित आहे... पण, मुलगा पत्निप्रीतीने आणि मी पुत्रप्रेमाने आंधळा झालो... सगळं मुलग्याच्या नावावर केलं... ... ... त्याने मला घराबाहेर काढलं...”

“अरेरे, इतक्या चांगल्या बापाला ‘ओळखले’ नाही त्याने?!”

“हं... आता ‘पाहिलं’ तरी खुरट्या दाढीच्या, तुटक्या चपला घातलेल्या, चिंध्यांआडच्या ‘फाटक्या बापाला’ ‘ओळखणार’ही नाही तो!”

“ओह्... करतो काय तो आणि असतो कुठे?”

“... हा काय... समोरच तर बसलाय माझ्या... मलाच ‘भिकारी ठरवून’!!!”



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ 
www.dramittukarampatil.blogspot.com 
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, December 22, 2019

‘... अजूनही तेच... “मेरा बाप चोर है!”’ (‘Still today... “Mera baap chor hain!”’)

‘... अजूनही तेच... “मेरा बाप चोर है!”’
(ललित लेख १३ ; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)




माझ्या वॉर्डमधला अगदी काल-परवाचाच हा प्रसंग!

एका ५-६ वर्षांच्या मुलग्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला तपासायला घेऊन एक महिला आणि दोन पोलिस आले होते.

पोलिसांमुळे गर्दीचे लक्ष तिकडेच!

“काय झालं याला,” त्याच्या आईला मी विचारले.

“बगा की डाक्टर... बेसुदासारका हाय ह्यो सकाळपसनं... बरळतुया सारका...”

“असा कसा अचानक बेशुद्ध झाला तो,” मी.

“सकाळच्याला माज्या दारुड्या न्हवऱ्याचा खून झालाय असं समजून माजी चवकशी करताना पोलिसांची काटी चुकून ह्येला लागली... रगात निगालं आन् बेसुदच झाला ह्यो... काय बी करा, पर वाचवा त्येला...”

तेवढ्यात तो परत बरळला... “माज्या आईनं नाय मारलं आप्पाला... तिला मारताना त्योच पडला खाली आणि मेला... दारू पिऊन रोज मारायचा त्यो ‘माज्या’ आईला...”

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ 
www.dramittukarampatil.blogspot.com 
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, December 15, 2019

घाम, अश्रू आणि रक्त! (Sweat, Tears and Blood)

‘घाम, अश्रू आणि रक्त!’
(ललित लेख १२; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

छायाचित्र साभार: गुगल


“तुमच्या मुलीचं रक्त खूप कमी आहे; लवकरात लवकर चढवावं लागेल.”

“खूप ठिकाणी चौकशी केली; पण ह्या रक्तगटाचं रक्त कुठंच नाही, डॉक्टर साहेब!”

“हे बघा, प्रयत्न करा... पण रक्त तर लागेलच..!”

“... ... ... ... ...”

“क्या हुआ भाईसाब, क्यूँ इतना परेशान दिख रहे हो? और, आँखों में ‘आँसू’?”

“... ... काही नाही... वो ख़ून चढ़ाना था लड़की को... और कल से मिल नहीं रहा है...”

“मेरा चलेगा... एक ही ब्लड ग्रुप हैं हम दोनों का... सुबह ही सिस्टर बता रहीं थी...”

“... विचारतो... पण..,”

“पर क्या..? ‘हरा’ नहीं, ‘लाल’ ही हैं हमारा ‘ख़ून’...”

“... बरोबरच आहे म्हणा... माणसं कसलीही असू देत... त्यांचे घाम, रक्त आणि अश्रू एकाच रंगाचे असतात की..!”

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Saturday, December 7, 2019

माय मरो पण... (Let such mother die...)

‘माय मरो पण ‘बाप’ जगो!’
(ललित लेख ११; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)


छायाचित्र: साभार गुगल


तीन दिवसांपासून सतत ‘झटके’ येतात म्हणून एका ‘बापा’ने ओपीडीत आणलेला नऊ वर्षांचा मुलगा!

त्याची ‘हिस्ट्री’ घेताघेता मी ‘फॅमिली हिस्ट्री’पर्यंत पोहोचलो...

“दोन वर्साआदी ज्यादिशी ‘ह्यो’ ‘मतिमंद हाय’ म्हून डाक्टरानं सांगितलं, त्यज्या दुसऱ्याच दिशी दुन्ही लेकरं टाकून ‘ह्य’जी आई पळून गिली..! जमत न्हवतं तरी दुनीबी पोरं म्याच सांबाळली...”

“‘ह्य’च्या आईला महिना हजार रूपये पोटगी जाती माजी... कोर्टानं उरपाटा निकाल दिला... पोरं ‘ती’ ‘टाकून’ गेली, तरीबी शिक्षा मलाच..! तिज्या घरच्यांच्या वरपर्यंत वळकी हायंत... आमी पडलो गरीब; काळं कुत्रं इचारत न्हाई आमास्नी...”

“‘ह्यो’ रडला न्हाई जलमला तवा; खरं ‘ह्य’ची आई रोज रडवती आमास्नी...”

“... लई दमवतंय पोरगं, पर ‘बाप’ हाय... हात नाय सोडायचा मी ‘त्य’चा कदी..!”

(संपूर्ण सत्य घटनेवर आधारित)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, December 1, 2019

रंगमंच की कठपुतलियाँ! (All Strings Attached!)

‘रंगमंच की कठपुतलियाँ!’
(ललित लेख १०; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)


छायाचित्र: साभार, गुगल




“... बाळ गेलंय तुमचं... त्याच्या हृदयाचे ठोके पूर्ण बंद आहेत आणि मशीनवरसुद्धा श्वास चालत नाहीये त्याचा...”

“परत एकदा बघा ना डॉक्टर... बाहेरून काही औषधं आणायची असतील तर लिहून द्या; पण वाचवा त्याला...”

“खूप नवसायास करून झालंय हे बाळ... आम्ही दोघं पण आता पन्नाशीत आहे... सगळे प्रयत्न केले... शेवटी ‘टेस्ट-ट्यूब’नं झालं... आठ-दहा लाख गेले... कर्जाचा डोंगर झाला... तरीही हार नाही मानली आम्ही... आणि, आता ते पण राहत नाही म्हटल्यावर काय होईल आमचं... कुणाकडे बघायचं आम्ही?”

मी हतबल... तसाच ‘निर्विकार’ उभा... करण्यासारखं काहीच नव्हतं हातात...

“आपण फक्त उपचार करतो; ‘वाचवणारा - न वाचवणारा’ ‘तो’च..! माणसाने प्रयत्न करायचे; यश-अपयश ‘त्या’च्या हातात... सारे ‘त्या’च्या मर्जीचे गुलाम...” पाठीमागून सर म्हणाले!!!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...