Sunday, October 20, 2019

मतदार‘राजा’ (The Voter)

‘मतदार‘राजा’’
(ललित लेख ६; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

प्रसंग: आज सकाळी ८.३० वाजताचा.
स्थळ: हॉटेल मंगेश, औरंगाबाद
पार्श्वभूमी: २१ ऑक्टोबरचे मतदान

“गप रे, तू काय मोदींचं सांगतोयंस! कालची सभा बघितलीस काय साताऱ्यातली... कोसळत्या पावसात सभा मारली पवार सायबांनी... एक माणूस हलला नाय जागचा... दिवसात हवा फिरवली... फेसबुक, वॉट्सॲप सगळीकडं सायंबच...”

“तू नको सायबांचं सांगू... मोदींचं काम बघ की... सर्जिकल स्ट्राईक, ३७० बित्तर... पाकिस्तानचं तोंड बंद... धुरळा नुसता... देशात नरेंद्र- राज्यात देवेंद्र...”

छायाचित्र साभार: गुगल

(फोन येतो)
“... मतदानाला येतो की आप्पा... खरं पैशाचा प्रॉब्लेमाय जरा... चार-पाच हजार पाठवा... तेवढंच ‘महिन्या’चं राशन... आणि गाडीभाड्याचंबी भागंल...”

“... ... ... ... ... ... ... ... ... ...”

“हं... काळजीच सोडा... करतो मत्दान... खरं, मत कुणाला ‘टाकायचंय’ आप्पा!!!???”

अशा रीतीने मतदार ‘स्व-वृत्तीने’ केवळ त्या ‘क्षणा’पुरता‘च’ राजा ठरला!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
(वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
(www.dramittukarampatil.blogspot.com
www.dramit100wordstories.blogspot.com)

Saturday, October 12, 2019

“नवरात्र: देवी “ती” आणि “ही”!” (Navratri: The Women and the Goddess)

“नवरात्र: देवी “ती” आणि “ही”!”

(ललित लेख ५; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

“बाप रे! आज भाजीत परत मीठ जास्त पडलं... आता माझं काही खरं नाही... कशानं ‘मार खायचा’ इतकंच माझ्या हातात... दिवसभर नोकरी-प्रवासाची दगदग... वरून हा नऊ दिवसांचा ‘उपवास’; आणि जवळपास रोजच नवऱ्याचा मार... याच्यानेच पोट भरतेय मी... घालूनपाडून बोलणं तर नित्याचंच... देवा, कधी सुटका करशील रे माझी यातून?”

छायाचित्र: साभार, गुगल

“... रोज मार खाते तरी सुधारत नाही, अवलक्षणी कुठली! स्वतः करते उपवास आणि मला मुद्दाम उपाशी ठेवते; कसली नवरात्र हिची, नाटकं नुसती...”

“अरे बाबा, आलो, थांब... ‘देवी’चं दर्शन घेऊन येऊ... नाही नाही, चप्पल नाही घालत मी नवरात्रीत... कडक भक्ती करतो मी ‘देवी’ची...”

घरची ‘देवी’ तशीच उपाशी... मार खाऊन रक्तबंबाळ... आणि, हृदयाशी अनंत जखमा कवटाळून..!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
(वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.dramittukarampatil.blogspot.com
www.dramit100wordstories.blogspot.com

Tuesday, October 8, 2019

“‘विजया’दशमी: माझ्यातल्या ‘राम-रावणाचा सण’’” (Dussehra: The festival of Rama and Ravana within..!)

“‘विजया’दशमी: माझ्यातल्या ‘राम-रावणाचा सण’...”
(ललित लेख ४, © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)


“...आई-बाबांची काही चूक नसतानाही मी त्यांच्याशी काल बराच वाद घातला...बायकोवर डाफरलो... मुलीला जवळ न घेता तिच्यावरही ओरडलो... घरातली सगळी शांतता बिघडवली...”

“... ‘विजय’चं (माझ्याआधी) ‘प्रमोशन’ झाल्याची बातमी काल अक्षरशः माझ्यावर थडकली... त्याचं ‘होमलोन’ही ‘निल’ झालं मागच्या महिन्यात, एक होंडा सिटी आली त्याच्या ‘थ्री बीएचके’च्या दारात...

...But, it's okay यार... खूप जास्त करतो तो काम... हुशार तर आहेच... पार्ट्या नाहीत, ‘मैत्रिणी’ नाहीत, बाकीचा ‘टाईमपास’ही नाही करत...सतत ‘नॉलेज अपडेट’ करतो, ‘एक्सपर्ट्स’शी चर्चा करतो, नावीन्याच्या शोधात राहतो... आणि हो, सगळ्यांना मनापासून मदत करतो, सर्वांशी छान ‘रिलेशन्स मेंटेन’ करतो...मी का जळतोय त्याच्यावर?”

“... आज दसरा... माझ्यातला ‘राम’ माझ्यातल्याच ‘रावणा’वर ‘विजय’ प्राप्त करू पाहतोय!!!”

साभार: गुगल इमेज


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
(वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

Sunday, October 6, 2019

“आठवांचा गुप्तहेर देवदूत... ‘चतुर’” (“‘Dragonfly: The angel spy”)

“आठवांचा देवदूत... ‘चतुर’”
(ललित लेख ३; © डॉ. अमित)
(#१००_शब्दांत_कथा)
(#100_word_story)

औरंगाबादमधील माझ्या होस्टेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या पिंपळवृक्षाच्या शेंड्याभोवती गेल्या महिनाभरापासून ‘चतुरां’नी गर्दी केली आहे...

औरंगाबादमधील माझ्या होस्टेलच्या खिडकीतून दिसणारे पिंपळझाड आणि त्याभोवती मुक्तछंदात उडणारे ‘चतुर’!


चतुरांची अशीच गर्दी मी महाराष्ट्राचे चेरापुंजी असणाऱ्या गगनबावड्याच्या सर्वोच्च टोकावर बसून २०१३ च्या पावसाळ्यांत अनुभवलीये. समोर अथांगपणे पसरून ‘निळ्याशार नभाला’ गवसणी घालणारी आणि ‘हरित तृणाच्या मखमालीचे हिरवे हिरवे गार गालिचे’ पांघरलेली सह्यशिखरे आणि चारी बाजूला ‘मुक्तछंदात’ उडणारे ‘चतुर’!

पावसाळ्यात गगनबावड्याच्या सर्वोच्च शिखरावरून दिसणारा नजारा... (उजव्या कोपऱ्यात एक ‘चतुर’ बागडताना दिसतोय!

The next time you happen to spy; the flight of a hovering dragonfly... ’मध्ये वर्णिल्याप्रमाणे आपल्या प्रियजनांचे संदेश घेऊन येणारे ‘ते’ आत्मेच जणू! पाण्याखाली जन्म घेऊनही गगनभरारी घेणारे, बदलत्या जीवनचक्राकडून आत्मभान शिकणारे, अलिप्तपणे सुख-दुःखांना स्पर्शणारे... आणि, जीवनाच्या क्षणभंगुरत्वाचे ‘स्व-ज्ञान’ गूढरम्य ठेऊन स्वच्छंदीपणाने उडत, आपल्या सोनेरी रंगाने मंत्रमुग्ध करणारे देवदूत.‌..चतुर!!!


चतुर- एक पावसाळी कीटक/ पतंग
गगनबावडा- जि. कोल्हापूर, महाराष्ट्राचे चेरापुंजी
काही संदर्भ- गुगल
सर्व छायाचित्रे- © डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
www.dramittukarampatil.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...