Sunday, April 26, 2020

वंशाचा दिवा (The son!)

“वंशाचा दिवा”
(ललित लेख ३१;
© डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




✓ ४० वर्षांपूर्वी-
“पेढे घ्या अक्का; मुलगा झाला... ‘वंशाला दिवा’ मिळाला!

“बरंय बाई; मला चारी पोरीच झाल्या... दिवा न्हाय; पणत्या म्हणं..!”

“पणत्या का दिवट्या..?”


✓ ५ वर्षांपूर्वी-
“आई... आम्ही सगळे ‘वेगळे’ राहतोय आता... सगळ्यांचीच घरं लहान आहेत... त्यात तू म्हणजे... तसं नव्हे; पण...”
.
आईची अडचण झाली का बाबांनू..?”
.
.
.
... नीरवता...


√ कालपरवाच-
चारही मुलं आईला मारतायंत...
.
“गावात मागून खातेस, आई?”
.
आई म्हणायलाही लाज वाटते तुला...”
.
“मागच्याच महिन्यात ५०० रुपये पाठवले होते ना मी? काय केलंस त्याचं? इतकं लागतं का खायला तुला?”
.
“आरं लेकरा, पाश्श्यात काय हुतंय? आठ दिस बी पुरत न्हाईत ते...”


✓ आज-
“तुम्ही उरकून टाका तिचं सगळं, सरपंच... पैसे पाठवतो आम्ही... यायला जमायचं नाही...”
.
.
.
.
.

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


Saturday, April 18, 2020

जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’? (Democracy and women power)

जिंकलं कोण- ही ‘ती’ की ती ‘ती’?
(स्त्रीशक्ती, लोकशाही आणि सत्ता)

(ललित लेख ३०;
© डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story



√ ‘निकाला’चा दिवस!

१७ सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ९-८ असा लागलेला...

त्यातील एक सदस्या काठावर उभी... इकडची पण आणि तिकडची पण... अशी!

सामना रंगला असतानाच ‘ती’ (= सदस्या) गायब!

‘आठ’वाल्यांनी ‘ती’ला आदल्या रात्री उचललंय...

‘नऊ’वाल्यांकडे धागधूग... कारण; पहिली ‘ती’ जिकडे; तिकडेच दुसरी ‘ती’ही (= सत्ता) जाणार!

‘नऊ’वाल्यांच्या गळाला ‘ती’चा नवरा!
.
.
.
.
.

√ सरपंच निवडीचा दिवस-

‘आठ’वाले पोलिस बंदोबस्तात ‘ती’च्यासह ‘नऊ’जणांना घेऊन पोहोचतात!

तुफान दगडफेक... निवडणूक अधिकारी घायकुतीला... पोलिसांचा लाठीचार्ज...
.
.
.
.
.
‘ती’चा नवरा: गपगुमान ‘नऊ’वाल्यांच्याकडं जा... तू तिकडनंच निवडून आल्यास!

‘ती’: आलती, पर आता न्हाय... आता मी अन् सत्ता दोनीबी ‘आठ’वाल्यांच्याकडंच हाय...

नवरा: मग मी सोडली तुला...

‘ती’: तू कशाला, मीच देते सोडचिठ्ठी... ‘सरपंच’ व्हणाराय मी गावची...
.
.
.
.
.
... जिंकलं कोण..?

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


Friday, April 10, 2020

आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..! (When our own people rip us apart...)

“आपलेच ओठ खाणारे आपलेच दात..!”
( When our own people rip us apart...)

(ललित लेख २९; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




डिसेंबर २०१७ मधील ‘उगाचच अस्वस्थ’ वाटणारी एक दुपार!

‘इंज्युरी सर्टिफिकेट’साठी आलेली एक मध्यमवयीन स्त्री, तिची आई आणि भाऊ..!

तुमच्या भैणीसारकी हाय ती लेकरा... नीट तपासा... पुलिसास्नी द्याचंय सर्टिफिकाट...” आजी म्हणाल्या.

“आजी, ताईंचं गळ्याभोवतीचं हाड तुटलंय... फोटोत* दिसतंय... सहजासहजी तुटत नाही ते... मारहाण वगैरे?”

“ तसं काही नाही... म्हणजे...” भाऊ म्हणाला.

“... ‘तसं काही’ म्हणजे..?”

“ डॉक्टरांच्यापासून काय लपवायचं म्हणा..! खरंय तुमचं... तिच्या दिरानेच तिच्यावर बलात्कार...

“ ... तुम्ही ‘इंज्युरी सर्टिफिकेट’ का मागताय मग..? सरळ ३७६ नोंदवा की बलात्कारासाठी...”

“ नाही सर... हिच्या मुलीचं ठरलेलं लग्न मोडेल मग... घराला वाळीत टाकेल भावकी...”

“ का? यांची काय चूक त्यात!!!”

“ तसंचंय, सर... आपलेच दात; आपलेच ओठ..!
.
.
.
.
.
.  सुन्नपणा
.  हतबलता आणि,
.  निःशब्दपणा!!!





(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

Saturday, April 4, 2020

राशोमोन! (Rashomon)

“राशोमोन” (Rashomon)#

(ललित लेख २८; © डॉ. अमित)
(सत्य घटनेवर आधारित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story


२०१५; ग्रामीण रुग्णालय, विरार.

मी एका साडेतीन वर्षांच्या मुलीचे ए. डी. सी.* भरतोय.
बाजूलाच पोलिशी चौकशी चालूयं.

तीन बाजू-

(१) पहिली-

समोरच मुलीचा बाप!

“काय झालं होतं मुलीला?”

“पावण्याच्या लग्नातनं चालत येत हूतो सायेब... वाट्ंला अंदार हुता... बंदाऱ्याचा काट दिसला नसंल पुरगीला... तोल जाऊन खाली मोट्या कातळावर पडली...”

(२) दुसरी-

मुलीची आई.

न विचारताच, “... ह्यनंच ढकलून दिलं माज्या पोरीला. संशे घेत हुता माज्यावर... काल पोरीचा काटा काडला ××××नं... झोडा त्यला स्ठेशनात निऊन...”

(३) खरी-

पोलिस पंचनामा.

“मयत मुलीच्या आईचे लग्नात उपस्थित असलेल्या ***** नामे व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. मयताच्या वडिलाने सदरबाबत जाब विचारला असता चिडून जाऊन महिला आणि तिच्या प्रियकराने संगनमताने मुलीला बंधाऱ्यावरून ढकलून देऊन तिचा घातपात केला.”



[# राशोमोन- जगप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अकिरो कुरोसावा यांचा १९५० साली जपानी भाषेत आलेला गोल्डन लायन, गोल्डन ग्लोब, अकॅडमी अवॉर्ड्सने सन्मानित प्रसिद्ध चित्रपट. यामध्ये एकाच प्रसंगाची तथाकथित साक्षीदारांनी मांडलेल्या बाजू आणि नंतर मृत व्यक्तीने स्वतःहून प्लँचेटद्वारे स्वतःच्या खुनाबद्दल दिलेली माहिती आणि त्याअनुषंगाने समोर आलेल्या विचित्र बाजू यांचे चित्रण करण्यात आलेले आहे.]

[* ए. डी. सी. (ADC)= Advanced Death Certificate= अंतरिम मृत्यू दाखला]


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

www.trekdoctoramit.blogspot.com

“... मीही सुंदर पिचाई..!” (सापेक्षतावाद आणि समाधान) Me too Sunder Pichai (Relativity and Satisfaction)

 “मीही सुंदर पिचाई!” (सापेक्षतावाद आणि समाधान) (ललित लेख ४५, © डॉ. अमित) प्रसंग- १ सद्गुरुंचं निरुपण ऐकत होतो. ‘मोठमोठ्या कंपन्यांचे अब्जावध...