“त्याआदीच मी मेली व्हती!” (ललित लेख २) (#१००_शब्दांत_कथा) (#100_word_story) अंगावरच्या वल्या हिरव्या साडी-चोळीवर मी सरकारी दवाखान्यातल्या खाटंवर निपचित पडून हाय. तितली डाक्टर, सिस्टर लोगं मला “वाचवायला” धावपळ करताना दिसत्यात. डाक्टर मला तपासून सिस्टरला म्हटला, “पेशंटचं ठोकं लागत न्हाईत” आणि मला कुठलं तरी इन्जक्शन द्यायला सांगितलं. तवर सलाईनबी लावली हुती तिनं. माज्याबरुबर शे-दोनशे माणसं आल्ती. डाक्टरनं घरच्यांना इचारलं, “काय झाल्तं हिला?”... “पाट्च्याला हिरीला गेल्ती तवा पाण्यात पडली; चुलीवरचा भात अजून तसाच शिजत हुता” न्हवऱ्यानं सांगितलं... “मेल्या ही”, गर्दीतनं कोणतरी म्हंटलं... लग्नानंतर बारा-तेरा वर्सात चार पोरीच झाल्या, पोरगं न्हवतं म्हूण तेवडी वर्सं सासरच्यांचा मार खाल्ला. पाचवं ‘पोरगं’ झालं तवा कुटं मार सोडून दोन येळचं खायाला मिळालं; पर “त्याआदीच मी मेली व्हती!” साभार: गुगल (सदर लघुकथा ही मी कोल्हापूर जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असताना घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.) (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र), www.dr...