Skip to main content

भिकारी आणि याचक (A beggar and a demandant!)

“भिकारी आणि याचक!”
(ललित लेख २६; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story



‘हेक्टिक ड्यूटी’ संपवल्यावर मन प्रसन्न व्हावं म्हणून औरंगाबादेतल्या वरदगणेश मंदिरात जाऊन बसलो होतो..!

दर्शनरांगेतील एकीने माझे लक्ष वेधले... कळकट-मळकट साडीत, सोबत एक फाटकी बॅग घेऊन उभी असलेली साठीतली एक महिला... भिकारीणच ती!

जवळच्या पुडक्यातील १०-१० च्या दोन नोटा आणि एक रुपयाचं नाणं काढून तिथल्या ‘दान’पेटीत टाकून तिने नारळही वाढवला. मग, हात जोडून मनोभावे नमस्कार करून ती पुटपुटली, “असंच ठीव रं बाबा आमास्नी समाधानी; सारकं-सारकं यीत जाईन तुझ्या देवळात; नारळ बी फोडत जाईन तुला...”

परतण्याआधी आणखीन एकदा नमस्कार करून बाहेर पडताना सोन्यात मढलेला एक ‘उच्चभ्रू’ देवासमोरच्या मूषकाच्या कानात याचना करत होता, “एवढं एक टेंडर मिळूदे देवा, तुला पाच सोन्याच्या नारळाचं तोरण बांधीन..!”



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५



Comments

  1. सुख कशात आहे हे याचे बोलके उदाहरणं

    ReplyDelete
  2. दोन भिन्न प्रवॄत्तीच्या,वर्गाच्या भिन्न व्यक्तींच्या मानसिकतेचे मार्मीक विवेचन ही कथा करते. या कथेतील स्त्री ही भिकारी असली तरी देण्याची नियत ठेवते म्हणजेच भिकारी असूनही देण्याची वॄत्ती ठेवते व आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्याची प्रार्थना करते .परंतु त्याच्या अगदी विरुद्ध वर्तन गर्भश्रीमंत व्यक्ती करतो व आपल्या स्वार्थासाठी प्रार्थना करतो व सर्व असूनही तो व्यक्ती कुठलेच दान करत नाही.त्यामुळेच या कथेतील स्त्री भिकारी असूनही श्रेष्ठ ठरते तर गर्भश्रीमंत असणारा व्यक्ती भिकारी ठरतो.या कथेतून दोन भिन्न मानसिकतेचा प्रत्यय आपल्याला येतो...

    ReplyDelete
  3. एक परिस्थिती मुळे भिकारी आहे तर दुसरा मानसिकतेने भिकारी आहे ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..! पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला. “कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले. “न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो. “काही मदत हवी असेल तर सांगा,” मी. फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती. ‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती. . . . त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.” “परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग)) (© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.) (सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग- www. dramittukarampatil.blogspot.com )

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस” (ललित लेख ३३, © डॉ. अमित) * तळटीप स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?” . . . “... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?” . . . दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!” . . . “... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?” . . . “... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?” . . . “... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!” (* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.) (...

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2) (© डॉ. अमित, ललित लेख ३७) ✓ प्रसंग १- “कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...” “जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...” “... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...” ✓ प्रसंग २- साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो... “संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...” “... पण, सर..,” फोन कट होतो... ✓ प्रसंग ३- “काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com