“आले देवाजीच्या मना...”
(By chance, luck or anything else?)
(ललित लेख २७; © डॉ. अमित)
#१००_शब्दांत_कथा
#100_word_story
२०१३ मध्ये मी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असतानाचा योगायोग!
“अहो, तुम्ही दोघे माझ्या आजी-आजोबांसारखे आहात म्हणून सांगतोय... अजून दोन दिवस थांबा... न्यूमोनियाच्या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होईल...”
“न्हाई आता डाक्टर सायेब... शेतीची कामं हाईती... जित्राबं हायंत... लई कामं खोळांबल्यात... सुट्टी द्या आमास्नी...”
“सगळं समजावून झालंय आजी; तरीही जायचंच असेल तर तुमच्या जबाबदारीवर सही करून जा...”
“व्हय... नशीब आमचं... इट्टलाला काळजी...”
.
.
.
.
.
संध्याकाळी एस. टी.च्या अपघाताची बातमी पोलिसांनी कळवली. त्यातील रुग्ण जेव्हा तपासणीसाठी माझ्याकडे आणले तेव्हा पाहतो तर काय, ‘ते’च आजी-आजोबा साक्षात स्ट्रेचरवर..!
“... लेकरा, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं...” आजी ‘कण्हत’ म्हणाल्या...
“तसं काही नसतं आजी...” कुठल्यातरी ‘गूढ शक्तींबद्दलच्या’ विचारांत असताना मी म्हटलं...
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५

परमेश्वराच्या इच्छेपुढे काही नाही
ReplyDeleteसर,मानवी समाजजीवना मधून जी लोकसाहित्याची निर्मिती होते ती निश्र्चितच मानवी अनुभवांवर आधारलेली असते. या लोकसाहित्याचाच एक भाग म्हणजे मानवी समाज जीवनात असलेल्या 'म्हणी'. या म्हणींनी लोकजीवन समॄध्द तर केलेच त्याचबरोबर नियंत्रित ही केले. मानवाने कसे वागावे? याचा आदर्श पाठच या म्हणींच्या माध्यमातून सांगितलेला असतो. या कथेच्या संदर्भानेही हेच आहे. या कथेतील आजी-आजोबांना तुम्ही सांगितलेला सल्ला कदाचित पटलाही असेल परंतु कौटुंबिक अडचणींपुढे त्यांना आपला आजार तोकडा वाटला असेल त्यामुळेच तर देवावर विश्वास ठेवून ते निघून जातात मात्र अपघात झाल्यानंतर मात्र तुम्ही सांगितलेला सल्ला ऐकला असता तर बरे झाले असते असे त्यांना वाटते.मानवी जीवनात एखाद्याने सांगितलेला चांगला सल्ला झुगारून देऊन आपण जेंव्हा आपल्याच मनाचे ऐकून वर्तन करतो व त्यातून आपत्ती ओढावते त्यावेळी साहजिकच उद्गार येतात; तुम्ही सांगितलेलं ऐकले असते तर..! आणि यातूनच पुढे माणूस आधार घेतो तो म्हणजे'आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना'. या कथेच्या संदर्भाने लेखनामागे हीच भावना असावी असे मला वाटते....
ReplyDelete