Skip to main content

आले देवाजीच्या मना... (By chance, luck or anything else?)

“आले देवाजीच्या मना...”
(By chance, luck or anything else?)

(ललित लेख २७; © डॉ. अमित)

#१००_शब्दांत_कथा
#100_word_story




२०१३ मध्ये मी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असतानाचा योगायोग!

“अहो, तुम्ही दोघे माझ्या आजी-आजोबांसारखे आहात म्हणून सांगतोय... अजून दोन दिवस थांबा... न्यूमोनियाच्या इंजेक्शनचा कोर्स पूर्ण होईल...”

“न्हाई आता डाक्टर सायेब... शेतीची कामं हाईती... जित्राबं हायंत...  लई कामं खोळांबल्यात... सुट्टी द्या आमास्नी...”

“सगळं समजावून झालंय आजी; तरीही जायचंच असेल तर तुमच्या जबाबदारीवर सही करून जा...”

“व्हय... नशीब आमचं... इट्टलाला काळजी...
.
.
.
.
.
संध्याकाळी एस. टी.च्या अपघाताची बातमी पोलिसांनी कळवली. त्यातील रुग्ण जेव्हा तपासणीसाठी माझ्याकडे आणले तेव्हा पाहतो तर काय, ‘ते’च आजी-आजोबा साक्षात स्ट्रेचरवर..!

“... लेकरा, तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं...” आजी ‘कण्हत’ म्हणाल्या...

“तसं काही नसतं आजी...” कुठल्यातरी ‘गूढ शक्तींबद्दलच्या’ विचारांत असताना मी म्हटलं...

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र))
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५


Comments

  1. परमेश्वराच्या इच्छेपुढे काही नाही

    ReplyDelete
  2. सर,मानवी समाजजीवना मधून जी लोकसाहित्याची निर्मिती होते ती निश्र्चितच मानवी अनुभवांवर आधारलेली असते. या लोकसाहित्याचाच एक भाग म्हणजे मानवी समाज जीवनात असलेल्या 'म्हणी'. या म्हणींनी लोकजीवन समॄध्द तर केलेच त्याचबरोबर नियंत्रित ही केले. मानवाने कसे वागावे? याचा आदर्श पाठच या म्हणींच्या माध्यमातून सांगितलेला असतो. या कथेच्या संदर्भानेही हेच आहे. या कथेतील आजी-आजोबांना तुम्ही सांगितलेला सल्ला कदाचित पटलाही असेल परंतु कौटुंबिक अडचणींपुढे त्यांना आपला आजार तोकडा वाटला असेल त्यामुळेच तर देवावर विश्वास ठेवून ते निघून जातात मात्र अपघात झाल्यानंतर मात्र तुम्ही सांगितलेला सल्ला ऐकला असता तर बरे झाले असते असे त्यांना वाटते.मानवी जीवनात एखाद्याने सांगितलेला चांगला सल्ला झुगारून देऊन आपण जेंव्हा आपल्याच मनाचे ऐकून वर्तन करतो व त्यातून आपत्ती ओढावते त्यावेळी साहजिकच उद्गार येतात; तुम्ही सांगितलेलं ऐकले असते तर..! आणि यातूनच पुढे माणूस आधार घेतो तो म्हणजे'आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना'. या कथेच्या संदर्भाने लेखनामागे हीच भावना असावी असे मला वाटते....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..!

संक्रांत... त्यांची... अन् आमची पण..! पहाटे ‘जॉगिंग’साठी करूळ घाटात गेलो होतो. घाटाच्या मध्यावर एक ऊसाचा ट्रक उलटलेला दिसला. “कुणाला लागलं आहे का?” तिथे बसलेल्या शेतकऱ्याला मी विचारले. “न्हाई, सायेब... मेलो असतो तर चाललं असतं... ऊस पण गेला आन् गाडी पण गेली,” तो. “काही मदत हवी असेल तर सांगा,” मी. फिरून परत येईपर्यंत शेतकऱ्याच्या घरची माणसं तिथे पोहोचली होती. ‘वरसाची कमाई पाण्यात गेली’ म्हणून ती मोठमोठ्यानं रडत होती. . . . त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारमधून एक स्त्री खाली उतरून शेतकऱ्याला म्हणाली, “थोडा ऊस द्या की... संक्रातीला पूजा करायला पाहिजेत.” “परसंग काय आन् तुमचं काय, ताई?! घ्या ऊस... पर हे ऐकण्यापेक्षा मी मेलो असतो तर..,” आशाळभूत शेतकरी हतबलपणे म्हणाला. (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग)) (© सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन आहेत.) (सदर लेखकाचा दुसरा वाचनीय ब्लॉग- www. dramittukarampatil.blogspot.com )

मरणाचा चॉईस... (The choice of death...)

“मरणाचा चॉईस” (ललित लेख ३३, © डॉ. अमित) * तळटीप स्टेशनात विश्रांती घेणारे मालगाडीचे इंजिन शेजारच्या इंजिनाला म्हणाले, “माझी चाकं धुऊन मी केलेलं पाप जाणाराय का? धुवायचं सोड; ते लपवता तरी येणारंय का?” . . . “... आपण माणसं थोडीच आहोत; गंगेच्या पाण्यात डुबकी मारून ‘केलेली’ पापं ‘धुवायला’..?” . . . दुसरे इंजिन बिथरून म्हणाले, “झालंय काय तुला आज? चक्क ‘माणसा’सारख्या पापपुण्याच्या गोष्टी करतोयंस..!” . . . “... काय करू मग, सांग ना... काल ‘त्या’ गोरगरिबांना मी चाकाखाली चिरडले... रक्तामासांने भिजलो... ‘घामा’ने दरवळलो... चाकं धुतली; पण, झालेल्या पापाचं..?” . . . “... कसलं पाप? उलट जीवन‘चक्रा’तून ‘सोडवलंस’ तू त्यांना... आजाराने नाहीतर भुकेने; मरणारच होते ते... आणि, मरायचा तरी ‘चॉईस’ कुठंय गरिबांना..! जिवंतपणी कुणी विचारपूस केली त्यांची, जी आत्ता होणाराय?” . . . “... माणसं नाही रे; माणुसकीच मेलीय चाकांखाली..!” (* तळटीप- सदर चित्र हे मी फेसबुकवरून डाउनलोड केले असून ते बनविणाऱ्याचे नाव मला सापडले नाही. चित्राचे संपूर्ण क्रेडिट हे संबंधित चित्रकाराचेच आहे.) (...

“टू बी ऑर नॉट टू बी...” (To be or not to be...) (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2)

“टू बी ऑर नॉट टू बी...” (संदिग्धता- भाग २)(Dilemma- Part 2) (© डॉ. अमित, ललित लेख ३७) ✓ प्रसंग १- “कशाला एवढं ‘टेन्शन’ घेताय, सर? लाख-दोनलाख घ्या आणि करून टाका सही... तुम्हाला नको असतील तर ‘वर-खाली’ वाटून टाका...” “जोशी, फार बोलू नका... सेक्रेटरी आहात, सेक्रेटरीसारखे रहा... मला माहितीये ‘काय बरोबर, काय चूक’ ते...” “... साहेऽब, माझेही केस उगाच नाही पांढरे झाले... तुम्ही कालपरवाचे... तुमच्या भल्याचंच सांगतोय... बघा ‘वरून’ फोन येतो की नाही ते...” ✓ प्रसंग २- साहेबांना त्यांच्या साहेबांचा फोन येतो... “संदीप, तुला माहितीये, दरवर्षी १००-१२५ लोक आयएएस होतात... तू काही एकटाच नाहीस... मर्यादेत रहा... रहेजाच्या फाईलवर सही करून टाक... आदेश समज हवंतर...” “... पण, सर..,” फोन कट होतो... ✓ प्रसंग ३- “काय करू मी..? माझे संस्कार, तत्त्वं, स्वच्छ चारित्र्याची तळमळ, गरिबांना न्याय... सगळं एकदम पाण्यात..! ” (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील, एम. बी. बी. एस., एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)) वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५ www.dramittukarampatil.blogspot.com www.trekdoctoramit.blogspot.com